गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारूची आयात करण्यासाठी चक्क बैलगाड्यांचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिरोंचा येथे केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्यातून नदीमार्गे येणारी अडीच लाखांची दारू पकडण्यात आली. ही विदेशी दारू तीन बैलगाड्यांमधून सिरोंचाकडे येत होती.
या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. एरवी वेगवेगळ्या प्रकारच्या चारचाकी वाहनांमधून छुप्या पद्धतीने गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात दारू आणून ती अनधिकृतपणे आणि चढ्या दराने विकली जाते. पण यावेळी प्रथमच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बैलगाडीतून दारूची आयात करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दारू तस्करांकडून दारूचा साठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी बैलगाडीतून दारू तस्करीचा प्रयोग केला. याबाबतची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार दि.27 च्या रात्री संदीप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातून दारूच्या पेट्यांची वाहतूक होणार असल्याचे कळल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एका पथकाने गडचिरोली येथुन जाऊन टेकडा गावालगत असणाऱ्या नदी परीसरात सापळा रचला.
विशेष म्हणजे तीन बैलगाड्यांमधून दारूच्या पेट्या येत असताना पोलिसांचा कानोसा घेण्याकरीता एक दुचाकीही त्यांच्यासोबत येत होती. त्या बैलगाड्यांमधून बिअर आणि व्हिस्कीचे 50 बॉक्स येत होते. त्याची किंमत 2,52,000 रुपये होती. याशिवाय बैलगाड्या, बैल असे साहित्य मिळून एकूण 4,22,00० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन उपपोलिस स्टेशन बामणी येथे संदीप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापू मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम, सर्व रा.टेकडा (ताला) या चार आरोपींना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना दीपक लोणारे यांनी केली.