शेतकऱ्यांकडील धान खरेदीसाठी अखेर ३१ मार्चपर्यंत मिळाली मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा, आ.गजबे यांचे प्रयत्न

गडचिरोली : यावर्षी शासनाच्या आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी दिलेली मुदत २९ फेब्रुवारीला संपत असताना शासनाने पुन्हा ३१ मार्चपर्यंत धान खरेदी करण्याची मुदत वाढवून दिली आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अवर सचिवांनी जारी केले. यासंदर्भात आ.कृष्णा गजबे यांनी धान उत्पादकांची समस्या शासनाकडे मांडून खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

यावर्षी धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना सातबाराच्या आधारावर पोर्टलवर आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक केले होते. त्यात अनेक ठिकाणी अडचणी गेल्या. ज्यांनी उशिरा नोंदणी केली त्या शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी अजूनही झालेली नाही. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी कमी झालेली आहे. ही बाब आ.गजबे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.