गडचिरोली : ऑनर किलिंगसारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार आता पोलिस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह उभारणार आहे. आंतरधर्मिय विवाह करणाऱ्या जोडप्यांना तिथे निवाऱ्यासोबतच सुरक्षा पुरवली जाणार आहे. परिस्थतीचे गांर्भीय लक्षात घेवून कमाल एक वर्षापर्यंत त्यांना या सुरक्षागृहाचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा नाममात्र शुल्क घेऊन पुरवली जाणार आहे.
देशात ऑनर किलिंगसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शक्ती वाहिनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात यापुढे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने जिल्हयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती वाहिनी समिती नुकतीच गठीत करण्यात आली. आहे. यामध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, तसेच सदस्य म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे असणार आहे. सदर विशेष कक्ष आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहाबद्दल प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या तक्रारींची योग्यरित्या दखल घेवून तात्काळ कार्यवाही करेल. तसेच दाखल प्रकरणे, संवेदनशील क्षेत्र याबाबत त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेईल.
आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरुवातीला एका महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेता जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत सुरक्षागृह उपलब्ध करुन देण्यात येईल. तेथे सदर जोडप्यांना पोलिस सुरक्षा व्यवस्था सुद्धा राहणार आहे. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्यामार्फत गडचिरोली येथे विशेष कक्ष स्थापन स्थापन्यात आला. संबंधित जोडप्यांनी या सेवेचा लाभ घेण्याकरीता भरोसा सेल, पोलिस अधीक्षक कार्यालय 07132-223149, किंवा समाजकल्याण विभाग 07132-222182 किंवा जिल्हा महिला व बाल विकास विभाग 07132-222645 यावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा शक्ती वाहिनी सदस्य सचिव प्रकाश भांदककर यांनी केले आहे.