नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित नारीशक्ती फिटनेस स्पर्धेत धावल्या युवती

युवतींसोबत युवकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली : 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रासह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत. परिवारिक जबाबदाऱ्यांसह इतर जबाबदाऱ्या महिला पार पाडत असताना त्यांचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याकरिता नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन केले होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती अभियानांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात 50 पेक्षा जास्त मुलींसह काही युवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक ख़ुशी एडलावार, द्वितीय गौरी चौधरी, तृतीय पल्लवी कुमरे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना टी-शर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्र समन्वयक अनुप कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पुजा निंदेकर, इशिका देठेकर, गुरुकुल अकॅडमी गडचिरोलीचे संचालक पुष्कर सेलोकर, अश्विन दुर्गे, अमित सुरजागडे, सुदर्शन जाणकी, प्रज्वल बोधनकर आणि संपूर्ण गुरुकुल अकॅडमीच्या समुहाने मिळून केले.