गडचिरोली : एका विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाने मला मारण्याची सुपारी दिली. त्यांचा संपर्क क्रमांकही मी पोलिसांना दिला. पण त्यांच्याकडून संबंधितावर कारवाई होत नसल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे हा हल्ला झाल्यानंतरच संबंधितांवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित करत एका शिक्षकाने संरक्षणाची मागणी पोलिसांकडे केली आहे.
रविंद्र सखाराम गिरडकर (५१ वर्ष) रा.नवेगाव (मुडझा) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी त्यांच्यावर बितलेल्या प्रसंगाची कहाणी गडचिरोलीत पत्रपरिषद घेऊन कथन केली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सावली तालुक्यातील सोनापूरच्या सुभाषचंद्र बोस हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे. यासोबत ते ज्ञान प्रसारक मंडळ फिस्कुटीचे सचिव आहेत. याच संस्थेचे अध्यक्ष तथा शाळेच्या मुख्याध्यापक असलेल्या इसमावर काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान तिला हा आरोप लावण्यासाठी रविंद्र गिरडकर यांनीच उचकावले असा समज करत मुख्याध्यापकांनी गिरडकर यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आपला त्या प्रकरणाशी संबंध नसल्याने मी त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने मुख्याध्यापकाने मला मारण्याची सुपारी देऊन गुंडांना माझ्याकडे पाठविले. पण माझा चांगुलपणा पाहून त्या गुंडांनी मला न मारता मारल्याचे नाटक केले असल्याचे रविंद्र गिरडकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगाही उपस्थित होता.