चिमुकलीला वासनेची शिकार बनविणाऱ्या आरोग्य केंद्राच्या शिपायाला ठोकल्या बेड्या

तडकाफडकी केले सेवेतून निलंबित

एटापल्ली : घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीला आपल्या शासकीय निवासात नेऊन तिला आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या आरोग्य विभागाच्या शिपायाला पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. त्याला लगेच आरोग्य विभागाच्या सेवेतून निलंबितही करण्यात आले. याशिवाय आरोग्य केंद्रात त्या दिवशी गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

संतोष नागोबा कोंढेकर (५२ वर्ष) असे त्या शिपायाचे नाव असून तो चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील रहिवासी आहे. ही घटना दि.९ ला एटापल्ली तालुक्यातील एका दुर्गम गावात घडली. कोंढेकर हा शासकीय क्वॅार्टरमध्ये एकटाच राहतो. घटनेच्या वेळी त्याने मुलीला जवळ बोलवून घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार एका मुलीने बघितल्यानंतर तिने घरी जाऊन त्याबद्दल सांगितले. यानंतर पीडित मुलींच्या कुटुंबियांनी तिला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, पण तिथे एका नियमित आणि दोन कंत्राटीपैकी एकही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने मुलीला रात्री गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात न्यावे लागले. आरोग्य विभागाच्या या सेवेबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. सोमवारीही नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.