गडचिरोली : चित्रपट कलावंत, मग ते कोणतेही असो, त्यांचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यातल्या त्यात एखादी सुस्वरूप अभिनेत्री आपल्या गावात येणार असेल तर तिला प्रत्यक्ष पाहण्याचा मोह कोणाला कसा आवारता येणार? वैरागड नगरीत याचा प्रत्यक्ष अनुभव हजारो नागरिकांनी घेतला.
निमित्त होते महाशिवरात्री उत्सवाच्या समारोपानिमित्त आयोजित महाप्रसाद आणि भोलूभाऊ मित्र परिवाराच्या वतीने आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ.कृष्णा गजबे, आ.डॅा.देवराव होळी, ज्येष्ठ नाट्यकलावंत पद्मश्री परशुरामजी खुणे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्यासह सत्कारमूर्ती मंचावर विराजमान होते.
‘नटरंग’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी आणि त्यातील गाजलेल्या गितांवरील नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अप्सरा, अर्थात सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होती. ‘अप्सरा आली… इंद्रपुरीतून खाली…’ हे गीत वाजत असतानाच ‘अप्सरा’ सोनालीची एन्ट्री झाली आणि उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सोनालीची झलक जवळून पाहता यावी यासाठी तिच्या चाहत्यांची धडपड सुरू झाली. त्यांची धडपड ओळखून सोनालीने अगदी आनंदाने आणि शांतपणे आपल्या चाहत्यांना सेल्फी व फोटो काढू दिले. त्यामुळे अप्सरा आली अन् मन जिंकून गेली..! अशा प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांच्या तोंडून निघत होत्या. यावेळी भोलू सोमनानी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी लोहखाण आणि प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्यात सात हजार लोकांना रोजगार मिळाल्याचे सांगितले. याशिवाय भोलू सोमनानी यांच्या कार्यपद्धतीची त्यांनी प्रशंसा केली. सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले, वैरागड भागातील नागरिकांशी माझा पूर्वीपासून ऋणानुबंध आहे. भंडारेश्वर मंदिराच्या टिपूर पुजनानिमित्त मंदिरात दरवर्षी येणे होते. त्याचप्रमाणे ना.धर्मरावबाबा आत्राम आणि मी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असलो तरी आमचे मनभेद नाहीत, असे सांगून त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
यावेळी झाडीपट्टी नाटकांमधील ज्येष्ठ कलावंत पद्मश्री परशुरामजी खुणे, आदिवासी सेवक डॅा.चिरंजीतसिंग सलुजा, सेवानिवृत्त कॅप्टन सुरेंद्र तावेडे यांच्यासह इतर काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भोलू सोमनानी, शितल सोमनानी, गौरी सोमनानी आणि गावातील इतर लोकांच्या हस्ते पाहुणे आणि सत्कारमूर्तींचे स्वागत करण्यात आले.
– अन् सोनाली झाली प्रभावित
या कार्यक्रमाप्रसंगी बोलण्यासाठी सोनाली कुलकर्णी हाती माईक घेऊन उभी झाल्यानंतर गोड आणि स्पष्ट आवाजात त्यांनी गडचिरोली आणि वैरागडमध्ये येण्यापर्यंतचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले ते भोलूभाऊ स्टेजवर मध्यभागी विराजमान असतील असे वाटत होते, पण ते कुठेच दिसत नव्हते. एवढेच नाही तर ते स्टेजवरही कुठे दिसत नसल्याने भोलूभाऊ कुठे आहेत, असा प्रश्न मला पडला होता. पण विविध सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक दायित्व निभावणारे व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापासून स्वत:ला दूर ठेवत असल्याचे पाहून मी खूप प्रभावित झाले, असे सोनाली म्हणाली. या जिल्ह्याच्या पवित्र मातीत येण्याचे भाग्य मिळाल्याने आपण धन्य झालो. मला वारंवार या भागात यायला आवडेल, असे म्हणताच प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी ‘हर हर महादेव…’ असा गजर करीत सोनाली जाण्यासाठी निघाली त्यावेळी पुन्हा अनेक तरुण-तरुणींनी फोटो काढण्यासाठी तिच्याभोवती गराडा घातला. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार करून तिने निरोप घेतला.