२३८ अंगणवाडी सेविकांना मिळाले स्मार्टफोन, अंगणवाड्यातील रजिस्टर होणार हद्दपार

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते वाटप

अहेरी : अंगणवाडी केंद्रांत बालकांना पोषण आहार दिला जातो. त्यांचे वजन, उंची त्यांना मिळणारा सकस आहार याकडे सेविकांना बारकाईने लक्ष ठेवावे लागते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना विविध रजिस्टरमध्ये लिहून ठेवावा लागत होता. मात्र, शासनाकडून आता अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिल्याने अंगणवाडीतील विविध रजिस्टर आता हद्दपार होतील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी बालविकास प्रकल्प कार्यालय, अहेरीद्वारा आयोजित अंगणवाडी सेविकांचा सन्मान व मोबाईल वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, तहसीलदार हमीद सय्यद, गटविकास अधिकारी राहुल वरठे, राकाँचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.आत्राम म्हणाले, अंगणवाडी सेविकांचे विविध प्रश्न प्रलंबित होते. काही प्रश्न सोडविण्यात आले असून उर्वरित प्रश्न देखील मंत्रिमंडळात सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान बालविकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत कार्यरत २३८ अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिकांना धर्मरावबाबा यांच्या हस्ते स्मार्ट फोन वाटप करण्यात आले. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांचीही आता डिजिटलकडे वाटचाल सुरू झालेली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांना मोलाचे मार्गदर्शन केले. बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.