आरमोरी : महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या स्पर्धेत केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोगीसाखराने विभागीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला. त्यानिमित्ताने मुंबई येथे झालेल्या अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाळेला 11 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यात विधान परिषद सदस्य कपिल पाटील, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे शिक्षण संचालक शरद गोसावी, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड प्रामुख्याने उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यातील सर्वच सरकारी व खाजगी शाळा सहभागी झालेल्या होत्या. त्यापैकी राज्य व विभागीय पातळीवर विजयी झालेल्या एकूण 66 शाळांना मुंबई येथील मुख्य सोहळ्यात मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाळेचे पदवीधर विषय शिक्षक आनंदकुमार हेमके, शिक्षक केवळराम शेंडे, वामन उईके, शिक्षिका हर्षा पिलारे, गटसाधन केंद्र आरमोरीचे गट समन्वयक तथा केंद्रप्रमुख कैलास टेंभुर्णे, वडधा केंद्राचे केंद्रप्रमुख रघुनाथ बुल्ले, पं.स.आरमोरीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे उपस्थित होते.
हे यश मिळवून देण्यात शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक अशोक दोनाडकर तथा शिक्षिका सुलभा लांडगे, छाया सोनकुसरे, जोगीसाखराचे सरपंच संदीप ठाकूर, जंगल कामगार संस्था जोगीसाखराचे अध्यक्ष दिलीप घोडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व गावकरी यांचा मोलाचा सहभाग आहे.
या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी वैभव बारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, सर्व शिक्षक संघटनांनी, जिल्हा परिषद केंद्र शाळा जोगीसाखरा येथील विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.