महिला उद्योजक आणि बचत गटांचा जिल्हा सहकारी बँकेकडून सत्कार

जगाला सावली देणारे व्हा- सावकार

गडचिरोली : उद्योजक महिला म्हणून तुम्ही आर्थिक क्षेत्रात भरीव योगदान देत आर्थिक संस्कृती निर्माण करत आहात. सोबत आपल्या राष्ट्रीय व सामाजिक संस्कृतीलाही जपत आहात. आपण समाजाला चांगले काय देऊ शकतो याचाच नेहमी विचार करायला हवा. आयुष्याच्या वाळवंटात आपण जगाला सावली देणारे वृक्ष व्हायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ सहकार नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले.

जिल्हा बँक आणि नाबार्डच्या वतीने बँकेच्या सभागृहात झालेल्या जिल्ह्यातील उद्योजक महिला आणि आणि बचत गटांच्या महिलांच्या सत्कार सभारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक पौनिकर, आत्माच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे, कृषी अधिकारी शितल खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अरविंद सावकार म्हणाले, भारतात प्राचीन काळापासून स्रीयांना उच्च स्थान देण्यात आले आले. ईशान्येकडील राज्यांत वडीलांएवजी आईचे नाव लावण्याची परंपरा आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. सोबत मुलांवर उत्तम संस्कार करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. मुले मोबाईलमध्ये हरवली असल्याने कौटुंबिक संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नाबार्डचे व्यवस्थापक पौनीकर, अर्चना कोचरे यांनी बचत गटांच्या विकासावर मार्गदर्शन करून योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले.

या उद्योजिका आणि बचत गटांचा केला सन्मान

या सोहळ्यात पोर्ला येथील श्रीगणेश महिला बचत गट, भेंडाळा येथील सरस्वती महिला बचत गट,तसेच मसाला उद्योगात प्रगती करत असलेल्या काटली येथील निकिता रामदास पेंदाम, मरेगाव येथील कापड स्टोअर्सच्या संचालिका मीना गोवर्धन कस्तुरे, येवली येथील स्टेशनरी व्यावसायिक माधुरी विशाल सेलारे आदींचा अरविंद सा.पोरेड्डीवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.