गडचिरोली : अखेर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करत निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली. गडचिरोली-चिमूर क्षेत्रात पहिल्याच टप्प्यात, म्हणजे १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पण अद्याप प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. लग्नाची तारीख निश्चित झाली, तयारीही सुरू झाली, पण ज्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकायची तो नवरदेव कोण हेच ठरले नाही, अशी काहीशी अवस्था सध्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाची झाली आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत ताणून एेन वेळेवर उमेदवारी जाहीर करण्याची काँग्रेसची जुनी सवय अजूनही तुटलेली नाही, तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराचा पेच सोडविताना दिल्लीश्वरांना यावेळी नको तेवढा विचार करावा लागत आहे. आता निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पहिल्याच टप्प्यात गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी मतदान होणार असल्याने आघाडी-युतीने उमेदवारांचा ‘सस्पेन्स’ लवकर दूर करणे गरजेचे झाले आहे.
महाविकास आघाडी कोणावर डाव लावणार?
महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्यावर असलेल्या या मतदार संघात १० वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा आपल्या पक्षाचा खासदार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी क्लासवन अधिकारी असणारे डॅा.नामदेव किरसान गेल्या ६ वर्षांपासून या मतदार संघात तळ ठोकून गावागावात हजेरी लावत आहेत. अशा स्थितीत त्यांना काँग्रेसने यावेळी तिकिटात हुलकावणी दिली तर काँग्रेसकडे मेहनती माणसाची किंमत नाही, हा मॅसेज जाईल. त्यांच्या तुलनेत या मतदार संघात माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांचा जनसंपर्क मर्यादित आहे. सतत दोन वेळा हार खावी लागल्यानंतरही त्यांना जनसंपर्क वाढवून या मतदार संघावर पकड मजबूत करण्यात यश आलेले नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकणे काँग्रेससाठी ‘रिस्की गेम’ ठरेल, अशी जनभावना आहे. तिसरे स्पर्धक डॅा.नितीन कोडवते हे पाच-सहा वर्षांपासून राजकारणात थोडे सक्रिय झाले असले तरी अजून ते नवखेच आहे. या भल्यामोठ्या मतदार संघाचा अवाका सांभाळायचा असेल तर त्यांना अजून काही वर्ष पक्षासाठी वेळ देऊन बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत.
– तर भाजपला ओव्हरकॅान्फिडन्स नडणार?
महायुतीत भाजपच्या वाट्याला असलेला हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी सोडणे भाजपला पचनी पडत नसल्याचे दिसते. अहेरी विधानसभा मतदार संघ कन्या भाग्यश्रीताई यांच्यासाठी सोडल्यामुळे धर्मरावबाबा लोकसभेचा चान्स घेऊ पाहात आहेत. प्रत्येक वेळी आमदारकीसोबत मंत्रीपदाची खुर्ची पटकावणाऱ्या ‘दिलो के राजा’ला आता खासदारकीची खुर्चीही मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसरीकडे दोन वेळा आमदार, दोन वेळा खासदारकी मिळालेले अशोक नेते यावेळी विजयी हॅटट्रिक करण्याचा चंग बांधून कामाला लागले. जनसंपर्काच्या बाबतीत ते सर्वात पुढे आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पण यावेळी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी संघाला पुढे करून त्यांच्या मार्गात भूसुरूंग पेरले आहेत. त्यामुळे त्यांना तिकीटच मिळू नये, म्हणजे ‘न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी’ असा गेम प्लॅन आखण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपला आपल्या पक्षीय संघटन कौशल्यावर एवढा विश्वास वाढला आहे, की कोणी नवखा उमेदवार उभा केला तरी त्याला निवडून आणू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपमध्ये संघटना बांधणीवर आणि मार्केटिंग यंत्रणेवर ज्या पद्धतीने वर्षभर मेहनत घेतली जाते, त्यावरून भाजपमध्ये एवढा विश्वास असणे साहजिकही आहे. कदाचित त्यातूनच नवीकोरी पाटी असलेल्या डॅा.मिलिंद नरोटे यांचे नाव पुढे आले आहे. व्यक्ती म्हणून डॅा.नरोटे यांची प्रतिमा स्वच्छ आहे यात वाद नाही, पण राजकीय अनुभव नसताना त्यांना विधानसभेएवजी भल्यामोठ्या लोकसभा लोकसभा मतदार संघात धावायला उतरविणे हा भाजपसाठी ओव्हरकॅान्फिडन्स तर ठरणार नाही ना, अशीही कुजबूज लोकांमध्ये सुरू आहे.