गडचिरोली : गडचिरोली-चिमुर या अनुसूचित जमातीसाठी राखीव लोकसभा मतदार संघासाठी बुधवार दि.20 ला अधिसूचना जारी होऊन ईच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन स्वीकारणे सुरू होणार आहे. येत्या 27 मार्चपर्यंत नामनिर्देशन स्वीकारले जाणार असले तरी शनिवार, रविवार हे सुटीचे दिवस वगळता त्यासाठी अवघे 6 दिवस मिळणार आहेत. दुसरीकडे प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणाही केलेली नाही.
नामनिर्देशन सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात किंवा निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरही भरता येणार आहे. मात्र पोर्टलवर भरल्यानंतर मुद्रित प्रत प्रत्यक्ष कार्यालयातही (जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्ष, जुने नियोजन भवन) दि.27 मार्चपर्यंत सादर करावी लागणार आहे.
28 मार्चला नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्याची वेळ 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. निवडणूक रिंगणात शिल्लक राहणाऱ्या उमेदवारांना त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. त्यामुळे 31 मार्च ते 17 एप्रिल असे प्रचारासाठी प्रत्यक्षात 18 दिवसच मिळणार आहेत. दि.19 एप्रिलला मतदान असल्यामुळे दि.17 ला संध्याकाळी 5 वाजता जाहीर प्रचार थांबवावा लागणार आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येणार सहा विधानसभा मतदार संघांपैकी गडचिरोली जिल्ह्यातील तीनही आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या चार विधानसभा क्षेत्रात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी आणि चिमूर क्षेत्रात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर मंगळवारी पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदारसंघात जाणार हे निश्चित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी विवेक सोळंके, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर.टेंभुर्णे, तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हेमंत जंबेवार, दत्तात्रय खरवडे, प्रकाश गेडाम, सुनील चडगुलवार, अनुप कोहळे, वासुदेव शेडमाके आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी आरमोरी येथे 302, गडचिरोली 356, तर अहेरी येथे 292 मतदान केंद्र आहेत. या एकूण 950 मतदार केंद्रांकरिता 2502 बॅलेट युनिट, 1320 कंट्रोल युनिट व 1348 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. निवडणूक मतदान यंत्र वितरीत करताना 20 टक्के कंट्रोल युनिट व 30 टक्के व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त देण्यात आल्या आहेत. यानंतर कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया पार पाडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली.