गडचिरोली : गडचिरोली पोलिस दल आणि सीआरपीएफच्या जवानांनी मंगळवारी पहाटे केलेल्या कारवाईत तेलंगणातून आलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या चारही लोकांवर मिळून महाराष्ट्र सरकारचे ३६ लाखांचे इनाम होते. त्यांच्याजवळ आधुनिक बंदुकांसह स्फोटासाठी लागणारे साहित्यही होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडविण्याचा त्यांचा डाव होता हे स्पष्ट झाल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सायंकाळी पत्रपरिषदेत सांगितले.
काही दिवसांपूर्वीच पोलिस महानिरीक्षक म्हणून पदभार घेतलेले संदीप पाटील आणि उपमहानिरीक्षक म्हणून पदभार घेणारे अंकित गोयल यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली. यावेळी एएसपी (अभियान) यतिश देशमुख आणि एएसपी एम.रमेश (अहेरी) हेसुद्धा उपस्थित होते.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये विभागीय समितीचा सदस्य व्हर्गिस (28 वर्ष), रा.जि.बिजापूर (छ.ग.), विभागीय समिती सदस्य पोडीयम पांडू ऊर्फ मंगुलू (32 वर्ष), रा.कोटराम, भैरमगड जि.बिजापूर (छ.ग.) या प्रत्येकी 16 लाखांचे इनाम असलेल्या जहाल नक्षलवाद्यांसह कुरसंग राजू आणि कुडीमेट्टा व्यंकटेश या प्रत्येकी 2 लाखांचे इनाम असलेल्या प्लाटून सदस्यांचा समावेश आहे. हे सर्वजण तेलंगणात सक्रिय होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातून प्राणहिता नदी पार करून काही नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत आले असल्याची गोपनिय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे जिल्हा पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकासह सीआरपीएफच्या पथकाने अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात अभियान सुरू केले. उपविभाग जिमलगट्टाअंतर्गत रेपनपल्ली उपपोलिस स्टेशनपासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडावरील जंगलात मंगळवारी पहाटे शोधमोहिम सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने फायरिंग सुरू केली. पोलिस जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर त्या भागात चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. एवढेच नाही तर बंदुकांसह इतर साहित्यही आढळले.
घटनास्थळावरून जप्त केलेल्या दोन स्वयंचलित रायफली आणि दोन देशी कट्ट्यांसह, काडतूक, स्फोटकात वापरले जाणारे साहित्य, वॅाकीटॅाकी यावरून नक्षलवाद्यांचा निवडणुकीदरम्यान घातपात घडविण्याचा कट होता हे स्पष्ट झाले. या भागात पहिल्याच टप्प्यात, म्हणते 19 एप्रिलला मतदान असल्यामुळे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले.