गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली असताना महायुतीच्या उमेदवाराचे नाव मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. हे नाव आधीच निश्चित झालेले असल्याचे सांगितले जात असले तरी ते जाहीर केले नसल्यामुळे नावातील सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वत: महायुतीच्या उमेदवाराचे नामांकन दाखल करण्यासाठी मंगळवारी (दि.26) गडचिरोलीत येणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांची ही उपस्थिती भाजपच्या उमेदवाराला बळ देण्यासाठी, की महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचा संदेश देण्यासाठी आहे, असे कोडे निर्माण झाले आहे.
केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आणण्यासोबत बहुमताचा आकडा 400 पार नेण्याचा चंग बांधण्यात आल्याने भाजपचे धुरींधर एका-एका जागेसाठी उमेदवारांची निवड करताना सर्व शक्यतांची पडताळणी करूनच निर्णय घेत आहे. भाजपमधील अंतर्गत धुसफूस पाहता विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा संधी मिळू नये असे प्रयत्न त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी केले. मात्र भाजपकडे ही जागा कायम राहिल्यास खा.नेते यांच्याशिवाय पर्याय नाही, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. दुसरीकडे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करत ना.धर्मरावबाबा आत्राम यांना उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.
‘लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची माझी ईच्छा असली तरी महायुतीत ही जागा ज्याला मिळेल त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून युतीधर्म पाळणार’, असे आधीच स्पष्ट करत धर्मरावबाबा एक पाऊल मागे घेण्यासही तयार आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली साताऱ्याची जागा भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या आग्रहाखातर त्यांना देण्याचा निर्णय शनिवारच्या मध्यरात्री दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर गडचिरोली-चिमूरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात जाण्याची राष्ट्रवादीच्या गोटाची आशा पल्लवित झाली आहे. दिल्लीतील त्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल हेसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे साताऱ्याच्या बदल्यात गडचिरोली-चिमूरची जागा राष्ट्रवादीकडे येणार की भंडारा-गोंदियाची हे लवकरच स्पष्ट होईल.