अहेरी : जिल्ह्यातल्या अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेच्या पुढाकाराने इकोफ्रेंडली होळीचे आयोजन केले होते. पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करताना होळीसारखा उत्सव नैसर्गिक रंगांनी खेळण्याबद्दल आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या नैसर्गिक रंगांचे निरीक्षण करण्यात आले. तसेच परिसरातील केर-कचरा गोळा करून होलिका पूजन करून होळी पेटविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकवृंदांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून पर्यावरणपूरक रंगपंचमी खेळण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य अनिल भोंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक युवराज करडे, श्याम बारसे, राष्ट्रीय हरित सेनेच्या जिल्हा मास्टर ट्रेनर जयश्री खोंडे उपस्थित होते. याप्रसंगी ग्रंथपाल हेमंत बोरकर यांनी पर्यावरणपूरक होळीवर आधारित उत्कृष्ट गीत सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या निसर्ग रंगांचे मान्यवरांनी निरीक्षण करून विद्यार्थांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री खोंडे यांनी तर संचालन मंगला भागवत यांनी केले. कार्यक्रमासाठी आतिष दोंतुलवार, शिवा दोंतुलवार, कमलाकर ठेंगरे, मुकेश गोंगले, सचिन पेदापल्लीवार, शेषराव दिवसे, मनीषा गुळघाणे, सुनीता ताजने, वंदना कडू, कीर्ती विश्वनादुलवार आदींनी सहकार्य केले.