अहेरी : तालुका मुख्यालय अहेरीजवळ असलेल्या वांगेपल्ली येथील पोचमार्गाचे काम न झाल्यामुळे तेलंगणात जाण्यासाठी अडचण येत होते. आता लवकरच हे काम केले जाणार असून त्याचे भूमिपूजन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते दि.30 रोजी करण्यात आले. त्यामुळे अहेरीवरून तेलंगाणा राज्याकडे केला जाणारा प्रवास आता सुखकर होणार आहे.
प्राणहिता नदीवर तेलंगणा राज्य सरकारने पुलाची उभारणी करून त्या पलीकडे रस्त्याचे बांधकाम केले आहे. मात्र राज्य सीमेवरून अहेरीकडे येण्यासाठी पोचमार्गाचे बांधकाम न झाल्याने मागील अनेक दिवसांपासून तेलंगाणा राज्यात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आधर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
भूमिपूजन कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, कंत्राटदार साई बोम्मावार, कार्यकारी अभियंता बलवंत रामटेके, उपविभागीय अभियंता पारेलीवार, कनिष्ठ अभियंता धम्मदीप रामटेके, अजय नागुलवार, मांतय्या आत्राम, मखमूर शेख, बाबूराव तोरेम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
काम दर्जेदार होणार- आ.धर्मरावबाबा
विशेष म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात थातुरमातुर काम न करता दर्जेदार आणि टिकाऊ काम करायचे असल्यास मोरीसह बांधकाम होणे गरजेचे होते. त्यामुळे पुरेशा निधीची आवश्यकता होती. 3 कोटी 11 लाख रुपये खर्चातून उभारल्या जाणारा हा रस्ता अहेरी-सुभाषनगरच्या मुख्य रस्त्याला जोड़णारा आहे. पुरेसा निधी मिळाल्यामुळे आता हे काम चांगल्या पद्धतीने मोरीसह होणार असल्याचे यावेळी धर्मरावबाबा म्हणाले.े