गडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी स्ट्राँग रुम, ईव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केद्रांना भेट देऊन पाहणी केली.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने पराशर यांनी कृषी महाविद्यालय येथील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का, याबाबत पराशर यांनी पाहणी केली. तसेच विद्युत शॉर्ट सर्कीटमुळे मतदान यंत्रांना हानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या कक्षातील व गॅलरीतील तसेच लगतच्या इतर कक्षातील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेला कृषी महाविद्यालयाचा परिसर त्रिस्तरीय बॅरिकेड लावून सुरक्षित करण्याची सूचना त्यांनी केली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ईव्हीएम साठवणूक कक्षालाही पराशर यांनी भेट देवून तेथील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. याठिकाणी सीसीटीव्ही, सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा व पुरेसे विद्युत दिवे आहेत का याबाबत पाहणी केली. तसेच ईव्हीम साठवणूक कक्षाला भेट देणाऱ्यांच्या नोंदी अभ्यागत नोंदवहीत नोंदविल्या जातात का याबाबत विचारणा करून नोंदवहीची तपासणीही केली.
पराशर यांनी एलआयसी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा, पंचायत समिती परिसर व रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधांसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याचे पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील खर्च निरीक्षण कक्षालाही त्यांनी भेट देवून तेथील नोंदवह्यांची पाहणी केली. सहायक निवडणूक अधिकारी मीना यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.