शेतकरी कामगार पक्षाची वेगळी वाट, कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार?

जिल्हास्तरीय समिती घेणार निर्णय

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खाणविरोधी आंदोलन, भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा-वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवाराने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचे सांगत शेतकरी कामगार पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. योग्य उमेदवारासाठी काम करण्यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हा समितीची बैठक आयोजित करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर लोहखाणींना स्थानिक ग्रामसभांच्या खदानविरोधी भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने आधीपासून समर्थन देऊन नेतृत्व केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ग्रामसभांसोबत दगाबाजी करत वेळोवेळी रोजगार मिळण्याच्या नावाखाली प्रकल्प आणि खाणींचे समर्थन केले आहे. ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न, पेसा-वनाधिकार, पाचवी अनुसूची, रेती तस्करी, बळजबरी भूसंपादन याबाबत जिल्ह्यात भाजपची जी भूमिका आहे, तीच भूमिका काँग्रेस आणि महाविकास आघाडीची आहे, असे सांगत शेकाप वेगळी भूमिका घेत आहे.

काही उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्ष आपल्यासाठी काम करणार असल्याचे गृहीत धरले असून न विचारता बॅनर, पोस्टरवर पक्षाच्या नावाचा उल्लेख करण्याचा खोडसाळपणा करीत आहेत. मात्र शेतकरी कामगार पक्ष खदानसमर्थक व ग्रामसभा विरोधी भूमिका असणाऱ्यांच्या सोबतीला जाणार नसून योग्य उमेदवारासाठी काम करण्याबाबत जिल्हा बैठक आयोजित करुन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल, असे पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, खजिनदार श्यामसुंदर उराडे, जयश्री जराते, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, जिल्हा सचिव देवेंद्र भोयर यांनी कळविले.