गडचिरोली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदानाच्या दिवशी (19 एप्रिल 2024) जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.
सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.