येंकापल्ली, नागेपल्लीतून जप्त केले ५५ लाखांचे बोगस कापूस बियाणे

आंध्रप्रदेशातून पुरवठा, अहेरी पोलिसांची कारवाई

अहेरी : आंध्र प्रदेशातून चोरट्या मार्गाने पुरवठा होऊन अहेरीसह परिसरातील गावांमध्ये बोगस कापूस बियाण्यांची विक्री करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल 55 लाखांचे बियाणे जप्त करण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तीन स्थानिक असून मुख्य आरोपी आंध्र प्रदेशातील गुंटूरचा रहिवासी असलेला समय्या उर्फ संबाशिवराव गुंजूपल्ली हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

प्राप्त माहितीनुसार, अहेरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विजय भरत चव्हाण हे पहाटे गस्त करीत असताना कारू रामा नैताम (रा.येंकापल्ली) तसेच वंदना रामचंद्र गुरनुले आणि मदनाबाई बापू निकोडे (रा.नागेपल्ली) यांच्या घरात संशयित कापूस बियाणे आढळले. ते बियाणे जप्त करून एपीआय चव्हाण यांनी पुढील प्रक्रियेसाठी तालुका कृषी अधिकाऱ्याला पाचारण केले.

ता.कृ.अधिकारी संदीश खरात यांनी जप्त केलेल्या बियाण्यांची पाहणी केली असता हे बियाणे 25 किलो वजनाच्या 120 बॅगमध्ये भरलेले होते. ते खुले असून त्यावर बियाण्याचा प्रकार, वाण, उत्पादन तारीख, अंतिम मुदत, बॅच नंबर, भौतिक शुद्धता, उगवण क्षमता अशी कोणतीही माहिती नव्हती. एुवढेच नाही तर ज्यांच्याकडे बियाणे आढळले त्यांच्याकडे बियाणे विक्रीचा परवानाही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एपीआय चव्हाण यांनी दोन महिलांसह आरोपी कारू रामा नैताम याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील सूत्रधार समय्या उर्फ संबाशिवराव गुंजूपल्ली याचा शोध सुरू आहे.