गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक आदिवासी व दलित संघटनांसह विविध समाजाने महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात पावीमुरांडा इलाक्यातील ग्रामसभा संघाचा समावेश आहे. खा.नेते यांनी पदावर नसतानापासून आदिवासींच्या हक्कांसाठी लढा दिला. आताही आम्ही ज्या-ज्या समस्या मांडल्या, त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद देत त्या समस्या मार्गी लावण्यासाठी नेहमी मदत केली. त्यामुळे आम्ही सर्व संघटना त्यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभ्या असल्याचे ग्रामसभांचे प्रतिनिधी मोहन पुराम यांनी सांगितले.
खा.नेते यांना पाठिंबा देणार असलेल्या संघटनांमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना, महाग्रामसभा संघ, आदिवासी गोटुल समिती, सरपंच संघटना, कोयतुर गोंड समाज संघटना, गोंड-राजगोंड महासंघ, आदिवासी समाज संघ, बिरसा मुंडा स्मारक समिती, क्रांतीवीर नारायणसिंह उईके-बाबुराव मडावी संघर्ष समिती, वीर बाबुराव शेडमाके संघर्ष समिती, राणी दुर्गावती महिला संघर्ष समिती, तसेच पंचशिल बौद्ध संघटना यांनी जाहीर बिनशर्त पाठिंबा दिल्याचे त्यांच्या वतीने कळविण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनविले. जनजाती गौरव दिवस घोषित केला. डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे महू, दिल्ली, मुंबई येथे स्मारक बनविले. लंडनमधील त्यांचे घर विकत घेऊन त्याला स्मारकात रूपांतरित केलं. आदिवासी-दलितांच्या योग्य सन्मानासाठी भाजप सरकारने पुढाकार घेतल्याने देशहित व विकासासाठी अशोक नेते यांना पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील 1400 ग्रामसभांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा हे एक थोतांड असल्याचा आरोप पुराम यांनी केला. जिल्ह्यात तेवढ्या ग्रामसभाच नसल्याचे ते म्हणाले.