गडचिरोली : देशाला नरेंद्र मोदींसारखे कणखर व सक्षम नेतृत्व देण्यासाठी आणि रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, लोहप्रकल्पासारखे मोठे विषय मार्गी लावण्यासोबत आमच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आमच्यापर्यंत येणारे खासदार अशोक नेते यांना पुन्हा खासदार म्हणून निवडण्यासाठी त्यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचे आदिवासी गोंड-गोवारी जमातीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भातील पत्र पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांना सोपविले.
माजी राज्यमंत्री परिणय फुके, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष विनायक वाघाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी या पाठिंब्यामागील कारणेही सांगितली. आदिवासी गोंडगोंवारी समाजाच्या संविधानिक व कायदेशिर मुलभूत हक्कांबाबत भाजप आणि महायुतीचे सरकार सकारात्मक आहे. मागील 38 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला सोडविण्याकरिता या सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 1985 मधील जीआर समाज कदापी विसरणार नाही. त्यामुळे आदिवासी गोंडगोवारी समाजाला धडा शिकवण्यासाठी खा.अशोक नेते यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष विनायक वाघाडे यांच्यासह कार्याध्यक्ष मारोती राऊत, श्रीराम राऊत, डॅा.पुर्णा नेवारे, रामू शेंदरे, श्रावण भोंडे, विजय नेवारे, अशोक राऊत, कैलास कोहळे, प्रल्हाद वघारे, श्यामराव वाघाडे, कवडू सहारे, श्यामराव वाघाडे, देवेंद्र चामलाटे, दिनेश शहारे असे लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
लोहार समाज संघानेही दिले पाठबळ
भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), आरपीआय, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत उभे असलेल्या खा.अशोक नेते यांना महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ गडचिरोली यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला. लोहार समाज भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा असून समाजबांधवांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन म.रा.लोहार व तत्सम समाज संघ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष सुरेश अर्जुन मांडवगडे यांनी पत्राद्वारे केले आहे.