गडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भूसुरूंगांचे स्फोट घडवून घातपात करण्याची तयारी नक्षलवाद्यांनी केली होती. त्यासाठी टिपागड परिसरात 6 प्रेशर कुकर, काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स (भूसुरूंग) नक्षलवाद्यांनी लपवून ठेवले होते. मात्र निवडणूक बंदोबस्तासाठी असलेली पोलिसांची तैनाती, पेट्रोलिंग यामुळे नक्षलवाद्यांना त्या स्फोटकांचा वापर करण्याची संधीच मिळू शकली नाही आणि मोठा अनर्थ टळू शकला. त्या स्फोटकांबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ती शोधून काढत नष्ट केल्याने नक्षलवाद्यांचा डाव उघडकीस आला.
गेल्या 19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जिल्ह्यात सीआरपीएफ, एसआरपीएफ, जिल्हा पोलिस दलासह इतरही काही सुरक्षा दलांच्या कंपन्या पाचारण करण्यात आल्या होत्या. त्यांच्या चोख बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांना कोणताही घातपात घडविणे शक्य झाले नाही. दरम्यान त्या स्फोटकांसंदर्भात पोलिसांना कुणकुण लागताच टिपागड परिसरात शोध घेण्यात आला. त्यात डोंगरावर स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले 6 प्रेशर कुकर, तसेच स्फोटकं आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले 3 क्लेमोर पाईप देखील सापडले. याशिवाय 3 क्लेमोर पाईप रिकामे होते. त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गन पावडर, औषधी आणि ब्लँकेटही सापडले. एकुण 9 आयईडी आणि 3 क्लेमोर पाईप्स, बॅाम्ब शोधक व नाशक पथकाच्या सहाय्याने घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली 2 बॅाम्बशोधक व नाशक पथकांसह सी-60 चे एक पथक आणि सीआरपीएफच्या एका क्युएटी पथकाने त्या भूसुरूंग आणि स्फोटक साहित्याचा रविवारी दिवसभर शोध घेतला. सोमवारी सकाळी या साहित्याचा शोध लागल्यानंतर घटनास्थळीच ते साहित्य जाळून नष्ट करण्यात आले.