गडचिरोली जिल्ह्यातील या गावांमध्ये तुमची सावलीही सोडणार तुमचीच साथ !

कोणती ती गावे, कोणते ते दिवस? वाचा

गडचिरोली : एखादी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरी ती कधी ना कधी तुमची साथ सोडू शकते, पण तुमची सावली तुमची साथ कधीच सोडत नाही, असे म्हटले जाते. पण हे विधानही चुकीचे ठरविणारे दिवस आले आहेत. अगदी डोक्यावर येणाऱ्या सूर्यामुळे काही विशिष्ट गावांमध्ये तुम्हाला शून्य सावली दिवस अनुभवायला मिळणार आहेत.

भौगोलिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचे असे शून्य सावली दिवस महाराष्ट्रात 3 ते 31 मे दरम्यान अनुभवता येणार आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांनी या भौगोलिक घटनांचा अभ्यास आणि निरीक्षण करावे, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील या गावांमध्ये घ्या अनुभव

कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो आणि दोन वेळा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. सध्या उत्तरायण सुरू आहे. त्यात 15 मे- सिरोंचा, 17 मे- अहेरी, आल्लापल्ली, 18 मे- मूलचेरा, 19 मे – चामोर्शी, 21 मे- गडचिरोली, 22 मे- आरमोरी आणि 23 मे रोजी देसाईगंज येथे दुपारी 12 ते 12.35 या वेळेत शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.

भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे 6.78° अक्षवृत्तावर 6 एप्रिल आणि 5 सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायणात शेवटी भोपाळजवळ 23.5 अक्षांसावर 18 जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो. लगेच दक्षिणायन सुरु होताच पुन्हा भोपाळ ते अंदमान भागापर्यंत पावसाळ्यातही शून्य सावली दिवस येतात, परंतु ढग आणि पाउस असल्याने आपल्याला बहुदा ते दिवस अनुभवता येत नाही.