गडचिरोली : वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी विविध वस्तूंच्या खरेदीला गडचिरोलीकरांनी पसंती दिली. त्यामुळे मार्केटमध्ये नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. विशेषत: सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने आणि गुंतवणूक म्हणून सोन्याची नाणी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. त्यामुळे सुवर्णालंकारांच्या दुकानांचा गल्ला शुक्रवारी सर्वाधिक भरल्या गेला.
विशेष म्हणजे गेल्या 8 ते 10 दिवसात गडचिरोलीत शुद्ध सोन्याचा (24 कॅरेट) प्रतितोळा (10 ग्रॅमला) 71,700 ते 72 हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा बेत अनेकांनी आखला होता. शुक्रवारी सकाळी जीएसटीसह 73 हजार 200 रुपयांवर असलेला शुद्ध सोन्याचा दर दुपारपर्यंत 73 हजार 900 वर पोहोचला. तरीही रात्रीपर्यंत सोन्याची खरेदी सुरूच होती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेली वस्तू अक्षय, अर्थात चिरकाल टिकते अशी नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर जास्त असतानाही सुवर्ण व्यापाऱ्यांनी बऱ्यापैकी व्यवसाय केल्याचे दिसून आले.
यासोबत घरात दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या वस्तू, भांडी, कपडे यांच्या खरेदीकडेही नागरिकांचा कल दिसून आला.