गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य सेवेत तज्ज्ञ डॅाक्टरांची कमतरता हा कळीचा मुद्दा झाला आहे. अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन महिलांचा गरोदरपणात मृत्यू होण्याच्या घटना मागील आठवड्यात घडल्या होत्या. त्यांच्या मृत्यूसाठीही तज्ज्ञ डॅाक्टर उपलब्ध नसणे हे प्रमुख कारण असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.प्रमोद खंडाते यांनी चार डॅाक्टरांची समिती गठीत केली आहे.
अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथील सरिता संतोष तोटावार आणि वडलापेठच्या नागूबाई जितेंद्र कोडापे या दोन महिलांचा बाळंतपणानंतर योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला होता. यातील सरिता तोटावार यांना हृदयरोग असल्याने प्रसुतीदरम्यान गुंतागुंत वाढू नये म्हणून जिल्हा रुग्णालयात त्यांना रेफर केले होते. पण कुटुंबियांना तिला घरी नेण्याची चुक केली. घरीच प्रसुतीही झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात आणले असताना उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला.
नागुबाई कोडापे यांचा मात्र प्रसुतीनंतर 13 दिवसांनी मृत्यू झाला. त्यांना गंभीर अवस्थेत अहेरीच्या रुग्णालयात आणले, पण फिजिशियन, सर्जन उपलब्ध नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. रुग्णाला अहेरीतून गडचिरोलीत आणण्यात वेळ जातो आणि योग्य वेळी उपचार मिळत नसल्याने ते दगावतात ही वस्तुस्थिती आहे.
का मिळत नाहीत तज्ज्ञ डॅाक्टर?
गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती, बदली केल्यानंतर ते जर रुजू होत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला आहे. असे असताना गडचिरोली जिल्ह्यात बदली करण्यासाठी आरोग्य विभागाकडे तज्ज्ञ डॅाक्टरच नाहीत, की नियुक्ती केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई करण्यास कुचराई केली जात असल्याने संबंधित डॅाक्टर सेवा देण्यास टाळाटाळ करतात, हा खरा संशोधनाचा विषय झाला आहे.