गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे 7 आॅगस्ट 2024 रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने 27 मे रोजी गडचिरोली येथील कात्रटवार कॉम्प्लेक्समधील कमल केशव सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. ओबीसींच्या अधिकारासाठी या महाधिवेशनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी केले.
यावेळी केंद्रीय कार्यकारिणीचे महासचिव सचिन राजुरकर, उपाध्यक्ष शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरेकर, सहसचिव शरद वानखेडे, प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, उपाध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, विदर्भ महिला संघटक संगीता नवघडे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने बैठकीला हजेरी लावली. जर मी निवडून आलो तर ओबीसींचे प्रश्न संसदेत लावून धरू, तसेच गडचिरोली शहरात ओबीसी भवनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. गडचिरोलीतील बैठकीत राज्य व केंद्रस्तरावरील मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातून ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्यासाठी तालुकानिहाय चर्चा करण्यात आली.
बैठकीचे प्रास्ताविक शेषराव येलेकर, संचालन रामकृष्ण ताजने तर आभार युवती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार यांनी मानले. बैठकीला मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.
असे आहेत तालुकानिहाय विविध शाखांचे पदाधिकारी
यावेळी गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध शाखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात गडचिरोली जिल्हा ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षपदी मंगला कारेकर, कार्याध्यक्ष लता मुरकुटे, उपाध्यक्ष ज्योती भोयर, अल्का गुरनुले, सचिव नम्रता कुत्तरमारे, सहसचिव ऐश्वर्या लाकडे, संघटक विमल भोयर, सुधा चौधरी, प्रसिद्धी प्रमुख वंदना चाफले, सदस्य पुष्पा धंदरे, लता म्हस्के, कविता हिवरकर, शहर उपाध्यक्ष नीलिमा ठाकरे, तालुका अध्यक्ष वर्षा गुरनुले आदींचा समावेश आहे.
युवती महासंघाच्या अध्यक्षपदी संतोषी सुत्रपवार तर सचिवपदी बुधा पोरटे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दादाजी चुधरी यांच्या नेतृत्वात जिल्हा ओबीसी महासंघाच्या कार्यकारणीत काही तुरळक फेरबदल करून जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून रामकृष्ण ताजने, उपाध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, सचिव सुरेश भांडेकर, जिल्हा संघटक प्रभाकर भागडकर, शंकर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
माजी महिला जिल्हाध्यक्ष संगीता नवघडे यांना विदर्भ संघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. राहुल भांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा युवा महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन सर्वांना डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.