जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकाचवेळी स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर

'प्रोजेक्ट उडान'मध्ये 4500 विद्यार्थी सहभागी

गडचिरोली : स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत पोलिस शिपाई पदभरती 2024 चा सराव पेपर क्र.4 टेस्ट सिरीजचे आयोजन केले होते. यात गडचिरोली पोलिस मुख्यालयासह जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांमधील वाचनालयात युवक-युवतींनी एकाचवेळी हा सराव पेपर सोडविला.

जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­ऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत मागे पडतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षेविषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोलीत सदर टेस्ट सिरीज घेतली जात आहे.

यावर्षी होत असलेल्या पोलिस शिपाई भरती 2024 च्या पार्श्वभूमीवर 25 मे रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहिद पांडू आलाम सभागृहात, तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रत्येक वाचनालयामध्ये मोफत पोलिस शिपाई भरती 2024 चा सराव पेपर क्र.4 टेस्ट सिरीजचे आयोजन केले होते. जिल्हाभरात 4500 विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली.

दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी, तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके व सर्व पोलिस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

मुंबईनंतर सर्वात मोठी पोलिस भरती गडचिरोलीत

या सराव पेपरदरम्यान अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी शहिद पांडू आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरला उपस्थित 1150 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, संपूर्ण राज्यात मुंबईनंतर सर्वात मोठी पोलिस शिपाई भरती गडचिरोली जिल्ह्रात होत असते. गडचिरोली जिल्ह्रामध्ये होतकरु विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना उचित व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सदैव प्रयत्नशिल आहे. यासोबतच विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आपले भवितव्य घडवायचे आहे त्यामध्ये सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याकरीता त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. या व्यतिरिक्त भविष्यात येणा­ऱ्या वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषी सेवक इ.परीक्षांचे सराव पेपर सुरु करत असल्याबाबतची व पोलिस अधीक्षक कार्यालय येथे स्किलिंग इन्स्टिट्युटमार्फत सुरु असणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर व मीडिया डेव्हलपर कोर्सेसबाबत माहिती दिली.