गडचिरोली : यावर्षीच्या उन्हाळ्यातील गेले चार-पाच दिवस सर्वाधिक तापमानाचे ठरले. गुरूवारीही (दि.30) पारा 45 अंशांवर होता. त्यामुळे गडचिरोली जिल्हावासिय अक्षरश: उन्हाने होरपळून निघत आहेत. पण आता नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. कारण दि.31 मे पासून तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या नवतपा सुरू असल्याने सूर्य आग ओकत आहे. रस्त्यावर कडक ऊन दिसत नसले तरीही उन्हाची तीव्रता अतिशय जास्त आहे. त्यामुळे दिवसाच नाही तर सूर्य मावळल्यानंतरही रस्त्याने जाताना उष्ण हवेचा सामना करावा लागत आहे. परंतू हवामान विभागाने 3 जूनपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजात दि.31 मे पासून गडचिरोलीसह विदर्भात तापमानात घट होईल असे सांगितले आहे. त्यामुळे सध्या 45 च्या घरात असलेले तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. यादरम्यान काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरीही येण्याची शक्यता आहे.12 जूनच्या सुमारास मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.