पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून त्याने निर्दयीपणे घातले कुऱ्हाडीचे घाव

आधी 'सायको'चे नाटक, नंतर दिली कबुली

कोरची : धारदार कुऱ्हाडीने स्वत:च्या पत्नीवर निर्दयीपणे घाव घालून जीवानिशी मारणाऱ्या पतीने अखेर या हत्येमागील कारणाची कबुली दिली. तिचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, असा त्याला संशय होता. त्यातूनच दोघांमध्ये खटके उडत होते. पण त्याच्या मानगुटीवरील संशयाचे भूत उतरत नसल्याने अखेर तिला कायमचे संपवूनच तो शांत झाला.

दरम्यान कोरची पोलिसांनी आरोपी रोहिदास बिरसिंग बंजार (37 वर्ष) याला गुरूवारी कुरखेडा न्यायालयापुढे हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. मंगळवारच्या पहाटे गाढ झोपेतच रोहिदास याने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाड चालवून तिला ठार केले होते.

आधीच रचला होता हत्येचा कट

पत्नीची हत्या करण्याएवढा कोणता अपराध तिने केला होता, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बोलते केले. पण सुरूवातीला त्याने मानसिक संकुलन ठिक नसल्याप्रमाणे बडबड करत बचावात्मक पवित्रा घेतला. पण गावातून कानोसा घेत पोलिसांनी त्याला बोलते केल्यानंतर त्याने हत्येमागील खरे कारण स्पष्ट केले. विशेष म्हणजे हत्येचा कट रोहिदासने आधीच रचला होता. त्यासाठी घरातील कुऱ्हाडीलाही त्याने धार लावून ठेवली होती. एवढेच नाही तर पूर्वसंध्येला त्याने पत्नीला तिच्या आवडीचे जेवण बनविण्यास सांगितले होते. पण त्याच्या मनात वेगळाच आणि भयंकर कट रचला होता याची पुसटशी कल्पनाही तिला आली नसावी.

रोहिदासने रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुवून ठेवली होती. ती कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत आणखी सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.