गडचिरोली : चारधाम यात्रेसाठी संपूर्ण भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात उत्तराखंड येथे पोहोचत असल्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर ताण पडत आहे. भाविकांना सुलभ व सहजपणे यात्रा पूर्ण करता यावी यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय चारधाम यात्रेचे नियोजन करु नये, असे आवाहन उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांच्यासह जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच भाविकांना ऑनलाईन नोंदणीनुसार सहज दर्शन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्तराखंड प्रशासनाने https:// registrationandtouristcare. uk.gov.in हे संकेतस्थळ सुरु केली आहे. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे. जेष्ठ नागरीक, तसेच वैद्यकीय उपचार घेत असलेल्या नागरिकांना यात्रा सुरु करण्यापूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधी उत्तराखंडच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्या https:// health.uk.gov.in/ pages/display/ 140-char-dham-yatra-health-advisory या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
चारधाम यात्रेसाठी नियोजन केलेल्या जिल्ह्यातील सर्व भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करुनच प्रवास करावा, तसेच यात्रेदरम्यान होणारी गैरसोय व गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.