अन् गडचिरोलीत वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी झाले सायकलवर स्वार

युवक-युवतींसह नागरिकही सहभागी

गडचिरोली : शरीर तंदुरूस्त राहावे म्हणून सायकलवरून रपेट मारण्याचा व्यायाम अनेक जण करत असतात. पण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना रस्त्यांवरून सायकल चालवत असल्याचे चित्र सहसा पहायला मिळत नाही. गडचिरोलीत सायकल दिनानिमित्त मात्र तब्बल 300 वर पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अनेक जणांनी सायकल रॅलीत सहभागी होऊन सायकल दिन साजरा केला.

३ जून या जागतिक सायकल दिनानिमित्त पोलिस दलाच्या वतीने या सायकल रॅलीचे आयोजन केले होते. गडचिरोलीसह जिल्हाभरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये या सायकल दिनाचे आयोजन केले होते.यात जेष्ठ नागरिक, युवक-युवती आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने 2018 पासून 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून हा सायकल दिन दरवर्षी साजरा केला जातो.

सायकल ही साधी, परवडणारी, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकुल असे शाश्वत वाहतुकीचे साधन आहे. सायकल चालविणे नेहमीच शरीर स्वास्थ्यासाठी फायदेशिर असते. लोकांमध्ये आरोग्य, स्वास्थ्यविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी व अधिकाधिक लोकांनी सायकलींचा वापर करावा यासाठी हा सायकल दिन साजरा केला जातो.

जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने सकाळी 6 वाजता पोलिस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौकापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या सायकल रॅलीमध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच पोलिस अधिकारी / अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक / युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. शेवटी या सायकल रॅलीचा शहिद पांडू आलाम सभागृहाजवळ समारोप करण्यात आला.

दररोज अर्धा तास सायकल चालना

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व सहभागी सायकलस्वारांना सहभागी प्रमाणपत्र दिले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सायकल चालविल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते. दररोज अर्धा तास सायकल चालवली तरी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. यात प्रामुख्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मानसिक आजार या आजारांपासून रक्षण होते. निरोगी जीवनासाठी सायकल चालविण्यास प्रोत्साहित करुन त्यांनी जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके व सर्व पोलिस अंमलदारांनी परिश्रम घेतले.