गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा वाढविण्यावर आपला भर राहणार आहे. सिंचन प्रकल्पांसाठी वनकायद्याच्या अडचणी असल्याचे कारण नेहमी पुढे केले जाते. पण जिल्ह्यातील खाणींसाठी वनकायद्याची अडचण येत नाही, मग सिंचन प्रकल्पांसाठीच का? असा सवाल करत नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी त्यावरही तोडगा काढू, असे सांगितले.
गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गुरूवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हावासियांसाठी प्राधान्याने सिंचनाच्या सोयी, तसेच आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॅा.किरसान म्हणाले, ही निवडणूक आगळीवेगळी ठरली. देशात जातीधर्माच्या नावावर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याला मतदारांनी धुडकावले. त्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने वातावरण निर्मिती केली. त्यामुळे जनता एकत्र आली. महाविकास आघाडीतील पक्षांनी एकदिलाने काम केले. त्याचा परिणाम म्हणून हे यश मिळाल्याचे ते म्हणाले.
गेल्या 10 वर्षात कामे झाली नाही या भावनेने लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. जिल्ह्याला नद्यांची देण असताना त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येत नाही. त्यासाठी सिंचनाच्या सोयी वाढविण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय रोजगार, स्वयंरोजगारातून युवकांना स्वावलंबी करण्यावरही आपला भर राहील, असे डॅा.किरसान यांनी सांगितले.
आमचे सरकार बसले तर…
केंद्रात आमचे सरकार बसले तर जाहीरनाम्यात दिलेले पाचही मुद्दे पूर्ण करणार असल्याचे डॅा.किरसान म्हणाले. ओबीसींची जातनिहाय जनगणना, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मला गेल्या अनेक वर्षात काही मिळाले नाही, तरीही मी पक्षाशी बांधिलकी ठेवत काम करत राहिलो, त्याचेच फळ म्हणून माझ्यासाठी सर्वांनी काम केल्याचे ते म्हणाले.
लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळवून देण्यासाठी, जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यापूर्वी आम्ही ज्या प्रश्नांना घेऊन आंदोलने केली ते विषयही हाताळले जाईल, असा विश्वास यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या या पत्रपरिषदेला शहर अध्यक्ष सतीश विधाते, सतीश चडगुलवार, कुसूम आलाम यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.