इंद्रावतीच्या तिरी पोलिस-नक्षल चकमक, स्फोटकांसह विविध साहित्य जप्त

तेंदू कंत्राटदारांकडून पैसे उकळण्याचा डाव

गडचिरोली : जिल्ह्यातील तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यासाठी नक्षलवाद्यांनी बैठक आयोजित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस छत्तीसगड सीमेवरील भागात शोध घेत असताना ग्यारेवाडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. उत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. मात्र या चकमकीत कोणीही जखमी झाले नाही, त्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहिमेत नक्षलवाद्यांचे स्फोटक साहित्य, पिट्टू बॅग व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

नक्षल दलमचे काही सशस्त्र कार्यकर्ते तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांना विश्वसनिय सुत्रांनी दिली होती. त्यानुसार इंद्रावती नदीच्या काठावरील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या परिसराचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 पथकाकडून ऑपरेशन सुरू करण्यात आले. दरम्यान बुधवारी सकाळी देचलीपेठा उपपोलिस स्टेशनअंतर्गत ग्यारेवाडा गावाजवळील इंद्रावतीच्या काठावर शोध घेतला जात असताना नक्षलवाद्यांनी पोलिस जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी जशाच तसे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी त्या भागातून पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यानंतर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे सामान, स्फोटके, वायर, बॅटरी, साहित्य आणि काही पिट्टू बॅग जप्त करण्यात आल्या. परिसरात आणखी शोध सुरू असून नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.