गडचिरोली : एरवी कडक सुरक्षेच्या घेऱ्यात राहणारे आणि दिमतीला २४ तास सरकारी वाहन राहणारे अधिकारी चक्क सायकलवरून रस्त्याने फिरतात तेव्हा पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहात नाही. सोमवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनच्या कमांडंट, उपकमांडंट आणि इतर अधिकारी व जवानांनी सायकलवरून रॅली काढत पर्यावरण दिनाच्या जागृतीचा संदेश दिला.
नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती यावी यासाठी कमांडंट देव राज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. तसेच त्यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. यानंतर अधिकारी आणि जवानांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यावेळी द्वितीय कमांडंट संजीव कुमार शर्मा यांच्यासह इतर अधिकारी व जवान उपस्थित होते.