१० पोलीस उपनिरीक्षक झाले सहायक पोलीस निरीक्षक

नक्षलविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरीनिमित्त वेगवर्धित पदोन्नती

गडचिरोली : नक्षलवादाने बरबटलेल्या या अतिसंवेदनशिल जिल्ह्यात सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना नेहमी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवर्धित पदोन्नतीसह विविध पदकांनी त्यांना सन्मानित केले जाते. जिल्ह्यात अशाच पद्धतीने नक्षलविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक म्हणून वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली.पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मंगळवारी (दि.६) त्यांची नावे जाहीर करण्यात आली.

पदोन्नती मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये संगमेश्वर ईश्वरराव बिरादार, सदाशिव नामदेव देशमुख, प्रशांत छोटुलाल बोरसे, राहुल नामदेवराव देव्हडे, प्रेमकुमार लगु दांडेकर, कृष्णा राजेंद्र काटे, राहुल विठ्ठल आव्हाड, भास्कर सोपानराव कांबळे, समाधान किसनराव दौंड आणि किशोर बाप्पासाहेब शिंदे यांचा समावेश आहे. त्या सर्वांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन करत भावी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.