गडचिरोली : चातगाव वनपरिक्षेत्रात करण्यात आलेली रोपवन लागवड, खोदतळे, रोहयोची कामे, वाघांच्या संवर्धनासह अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. त्यामुळे या कामांची आणि त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गडचिरोली वनवृत्तातील वनविभाग गडचिरोलीअंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. मार्च 2021 ते 2024 पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड, हेक्टरी मोजमाप, हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे, प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल केल्याचेही बोलले जाते. टिसीएमच्या नियमानुसार मोका तपासणी केल्यास ही बाब स्पष्ट होणार आहे. वरीलप्रमाणे प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार आहे. साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासणेही गरजेचे आहे.
अनेक कामावर बोगस मजुर दाखवुन स्वतःच्या स्वार्थासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामावर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा आहे. केलेली खोदतळ्यांचे कामे नियमबाह्य पद्धतीने केली आहेत. याशिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण, अवैख उत्खनन, अवैध वृक्षतोडही झाल्याचे प्रत्येक बिटचे निरीक्षण केल्यास समोर येणार आहे.
चातगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांमध्ये किती प्रमाणात जनजागृती करण्यात आली यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यमान वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या कारकिर्दीमधील हे प्रताप पाहता सर्व कामांची सखोल चौकशी करावी, अन्यथा भारतीय जनसंसद जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी कळविले. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा वनविभागाच्या सचिवांना पाठविले.