आरमोरी : पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेली यावर्षीची पोलिस भरतीची (2023-24) शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी आ.कृष्णा गजबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलिस भरतीसाठी (2023-24) शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया येत्या दि.19 जून 2024 पासून सुरू होणार आहे. या कालावधीत पाऊस आल्यास शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेतल्यास उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पावसात भरतीच्या ठिकाणी एक दिवस अगोदर जाणाऱ्या मुलांना झोपण्यासाठी जागा मिळणार नाही. कारण पोलिस भरतीसाठी येणारी मुलं बॅनर टाकून रस्त्यावरच रात्र काढतात. गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील उमेदवारांना अधिक पाऊस झाल्यास येण्याजाण्याचे सर्व मार्ग बंद होतात. तसेच दळणवळणाची साधने पुर्णपणे बंद असतात. १०० मीटर रनिंगचा सराव वर्षभर ग्राऊंडवर केल्यावर चाचणी परीक्षा रस्त्यावर घेतल्यास पाय गुंतून गुडघ्याला व पायाला कायमस्वरूपी दुखापत होऊ शकते. पावसात गोळाफेक करताना गोळा कोरडा/सुखा राहणार नाही. परीणामी गोळा हातातून निसटेल किंवा दुखापतही होऊ शकते. कधी पाऊस असेल तर कधी नसेल, यामुळे मुलांना समान संधी मिळणार नाही. मैदानी चाचणी पावसात घेतल्यास मैदानावर चिखल झाल्यास 1600 मीटर रनिंग व 100 मीटर रनिंग जमणार नाही.
तसेच मैदानी चाचणी तयारीनुसार येणाऱ्या मार्कपेक्षा पावसात घेतल्यामुळे मुलांना खुप कमी मार्क मिळेल. हा उमेदवारांवर अन्याय असून पोलिस भरती सन 2023-24 ची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी, अशी मागणी याउमेदवारांनी आ.गजबे यांच्याकडे केली.
विद्यार्थ्यांनी यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांनी याबाबत गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्याशी संपर्क करून या विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या समस्यांवर तोडगा काढून देण्याचे आश्वासन दिले.
हे निवेदन देताना मंगेश पाटील, स्वप्नील हजारे, अक्षय मारभते, सौरभ गोंदोळे, पुरणानंद सोमजाल, अक्षय मोतेकर, धमेंद रामटेके, प्रशांत सोरते, आदीत्य ठवकर, निशाद वैरागडे, पवन लाकडे, मिथुन कांदोर, पंकज मडावी, सौरभ श्रीरामे, रामू जुरी, इक्सेन नॉनजाल, साहिल मने, अमोल मने, सौरभ सारवे, कुणाल सारवे, आशुतोष सारवे, पंकज सपाटे, संदीप हेडावू, राहुल हेडावू, रोशन मने, जयश्री सुपारे, पायल चौधरी, कल्याणी मेश्राम, सोनाली चंदनखेडे आत्माराम सोरते, रतन गोधोळे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस भरतीत उतरलेले उमेदवार उपस्थित होते.