गडचिरोली : जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि नदी-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवते. त्या परिस्थितीत जीवित हाणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १५ जूनदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याची सुरूवात मंगळवारी (दि.६) गडचिरोलीत झाली. यावेळी कोटगल बॅरेज येथे मॅाक ड्रिलचे आयोजन केले होते.
पूर परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांसोबत पोलीस विभागाने कशा पद्धतीने मदत करावी याचे प्रशिक्षण पोलिसांना या कार्यशाळेत दिले जात आहे. मॅाक ड्रिलमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मोटर बोटच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच बचावकार्याच्या विविध पद्धतींची माहिती देण्यात आली. यात पोलीस दलाच्या ६० अंमलदारांनी, तसेच मोटार परिवहन विभागाच्या एका पथकाने सहभाग घेतला.
या कार्यशाळेला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा सल्लागार (आपदा मित्र) कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, एनडीआरएफचे निरीक्षक प्रदीप आदी उपस्थित होते.