पोलीस पत्नीच्या बदलीसाठी शिक्षक पतीने बनविला बनावट बदली आदेश

पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस, पतीला अटक

गडचिरोली : पोलीस दलात अंमलदार असलेल्या, पण एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील पोलीस मदत केंद्रात ड्युटीवर असलेल्या पत्नीची गडचिरोलीत शहरात बदली करण्यासाठी शिक्षक असलेल्या पतीने चक्क बनावट बदली आदेशाचा मेल पोलीस अधीक्षकांना पाठविला. अंमलदाराच्या बदलीसाठी गृहविभागाच्या सहसचिवांकडून मेल आल्याचे पाहून त्यांनाही शंका आली आणि तपासात महिला अंमलदाराच्या पतीने हा कारनामा केल्याचे समोर आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

संदीप मड्डेलवार (रा.वनश्री कॅालनी, गडचिरोली) असे बनावट मेल पाठविणाऱ्याचे नाव आहे. आरोपी संदीप हा चंद्रपूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर पूर्णवेळ शिक्षक आहे. त्याची पत्नी मिनाक्षी पोरेड्डीवार गट्टा जांबिया येथील पोलीस मदत केंद्रात कर्तव्यावर आहे. मिनाक्षी यांची बदली पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय गडचिरोली आणि दुर्गम भागातील पोलीस मदत केंद्र धोडराज येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार जमीलखान पठाण यांची बदली पोलीस अधीक्षक कार्यालयातील नक्षल सेलमध्ये करण्यासंबंधीचा ई-मेल ९ मे २०२३ रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाला होता. तो मेल गृह विभागाच्या सहसचिवांच्या नावे आला.

अंमलदारांच्या बदलीसाठी आणि नेहमीपेक्षा वेगळ्या मेल आयडीवरून मेल आल्याने पोलीस अधीक्षकांना शंका आली. स्थानिक गुन्हे शाखेला त्यांनी यासंदर्भात शहानिशा करण्यास सांगितले. चौकशीत गृहविभागाने तसा काही मेल पाठविलाच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तांत्रिक गोष्टी तपासल्या असता तो मेल ब्रह्मपुरी येथील एका सायबर कॅफेमधून पाठविल्याचे दिसून आले.

शिक्षकी पेशालाही लावला बट्टा
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी केलेल्या तपासात संदीप मड्डेलवार याने हा कारनामा केल्याचे उघडकीस आले. गृह विभागाच्या सहसचिवांच्या नावे बनावट मेल आयडी बनवून त्याने तो मेल पाठविला होता. आपल्यावर शंका घेऊ नये म्हणून त्याने हवालदार जमीलखान पठाण यांचेही नाव बदली आदेशात टाकले. त्यावरून संदीप मड्डेलवार याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीने आणि व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या व्यक्तीने पोलिसांची अशा पद्धतीने फसवणूक केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.