गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सक्रिय राहून नक्षल चळवळीला नियंत्रित करणारा जहाल नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर आणि त्याची पत्नी ललिता यांनी शनिवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. गडचिरोली पोलिसांनी शौर्यासोबत संवेदना जपल्यामुळेच नक्षलविरोधी अभियानात यश मिळत असल्याचे ना.फडणवीस म्हणाले.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध साहित्यांचे वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत आले होते. पोलिस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी खा.अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते.
जहाल नक्षली गिरीधर याच्यावर शासनाने 25 लाखांचे, तर पत्नी ललिता हिच्यावर 16 लाखांचे इनाम होते. या नक्षली दाम्पत्याला ना.फडणवीस यांनी संविधानाची प्रत भेट दिली. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी 25 लाख रुपयांची मदत करण्यात आली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या 4 वर्षांत जिल्ह्यातील एकही व्यक्ती नक्षल चळवळीत दाखल झाली नाही. सी-60 पथकाने आपला दरारा असा निर्माण केला की, एकतर त्यांना शरणागती पत्करावी लागेल किंवा बंदुकीचा सामना करावा लागेल. सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचू नये, हाच प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. पण आज तो विकास पोहोचतो आहे, हे मला गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाऊन पाहता आले आहे. गडचिरोली हा आमच्यासाठी महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. उद्योग, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. मोठी गुंतवणूक या जिल्ह्यात येत असल्याने रोजगार वाढेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक अंकित गोयल म्हणाले, गडचिरोलीत एकीकडे विकासात्मक कामे सुरू आहेत. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे योग्य पुनर्वसन केले जात आहे, आणि जे अजूनही नक्षल चळवळीतून बाहेर येण्यास तयार नाही त्यांना जशास जसे उत्तर दिले जात आहे. या तीनही मुद्द्यांमुळे नक्षल चळवळ मोडीत काढून जिल्हा विकासाच्या वाटेवर वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. या सर्व कामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून कायम सहकार्य व मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकातून नक्षलविरोधी कार्याची माहिती दिली.
…. म्हणून पोलिस भरतीला स्थगिती नाही
पावसाळ्याला सुरूवात झाली असल्याने पोलिस भरतीला स्थगिती देऊन ती पुढे घ्यावी अशी मागणी अनेक ठिकाणावरून झाली. पण आधीच लोकसभेच्या आचारसंहितेमुळे लांबलेली भरती प्रक्रिया आणखी पुढे ढकलल्यास पुढे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून ही प्रक्रिया आणखी रखडू शकते. यात काही युवक वयाच्या मर्यादेबाहेर जाऊन भरतीपासून वंचितही राहू शकतात. त्यामुळे संपू्र्ण भरती प्रक्रिया पुढे न ढकलता जेथे पाऊस आहे, तेथे दुसरी तारीख देऊन पदभरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
नक्षल चळवळीत झाला भमनिरास
यावेळी आत्मसमर्पित नक्षली संदीप उर्फ महारू समरू वड्डे याने आपले मनोगत व्यक्त करताना नक्षल संघटनेत खोटी स्वप्ने दाखवून शोषण केले जाते. मोठ्या कॅडरची मुले बाहेर शिकायला पाठवितात. पण छोट्या लोकांना पोलिसांसाठी लढण्यासाठी सोडले जाते. पण आत्मसमर्पणानंतर चांगले जीवन जगत असल्याचे सांगत त्याने पोलिसांना धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे आत्मसमर्पित नक्षली राधा मच्ची हिने आपले मनोगत व्यक्त करताना मी नक्षल चळवळीत घालविलेले आयुष्याचे 15 वर्ष वाया गेल्याचे सांगून आता आत्मसमर्पणानंतर हक्काचे घरकुल आणि सन्मानाचे जीवन जगत असल्याचे ती म्हणाली.