पालकमंत्री फडणवीस यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

आपत्‍कालीन परिस्थितीत संवेदनशीलता दिसावी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो. पावसाळ्यात येणाऱ्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.

शनिवारी संध्याकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन भवन येथे घेतला. यावेळी आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, माजी खा.अशोक नेते, जिल्हाधिकारी संजय दैने, नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गोसेखुर्द प्रकल्प व श्रीराम सागर बॅरेज या इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रकल्पातून पाणी सोडताना त्याची पूर्वसूचना मिळावी यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्कात राहावे. जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांची डागडुजी करून ते दुरूस्त करावे. पूरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये नवसंजीवन योजनेअंतर्गत आगाऊ उपलब्ध करून दिलेले धान्य व साहित्य संबंधितापर्यंत पोहोचले की नाही याची खात्री करणे, विद्युत विभागाने लाईनमन गावातच उपलब्ध राहील याची तपासणी करणे, सर्व धरणांवर सिंचन विभागाद्वारे कार्यान्वित केलेली देखरेख व्यवस्था सुव्यवस्थितपणे कार्यरत आहे का याचीही शहानिशा करण्याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

यावेळी लोकप्रतिनिधींनी आपले काही प्रश्न मांडले. त्यांच्या सूचनांची गांभिर्याने नोंद घेण्याची सूचना फडणवीस यांनी केली. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व उपाययोजनांची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी आभार व्यक्त केले.

किटाळी येथे कॉन्फरन्स हॉल व बॅरेकचे उद्घाटन

गडचिरोली पोलिस दलाच्या सी.टी.सी. किटाळी येथील कॉन्फरन्स हॉल व महिला पोलिस अंमलदार बॅरेकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिस दलाकडील विविध शस्रांस्रांची माहिती जाणून घेतली.