गडचिरोली : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळा शासन मान्यताप्राप्त असणे अनिवार्य आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात काही शाळा अधिकृतपणे शासनाची मान्यता न घेताच सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्या शाळांवर द्रव्यदंडाच्या शिक्षेसह कायदेशीर कारवाई होईल. पण अशा कोणत्याही अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
अनधिकृत असलेल्या शाळांमध्ये धानोरा तालुक्यातील पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल स्कूल मोहगांव, गडचिरोली तालुक्यातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टी या शाळांचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाने कळविले. याव्यतिरीक्त इतर काही अनधिकृत शाळा सुरु झाल्या असल्यास अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेवू नये. पालकांनी पाल्याचे प्रवेश घेतेवेळी शासनाची मान्यता आहे किंवा नाही याची खात्री करावी, तसेच गडचिरोली जिल्हाात अशा अनाधिकृत शाळा निर्दशनास आल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली यांना लगेच लेखी स्वरुपात माहिती द्यावी असे आवाहन शिक्षणााधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब पवार व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी केले आहे.