महिलेला मोबाईलवर पाठविला अश्लील मॅसेज, आंबटशौकिन उपसरपंचाला कोर्टाचा दणका

पाच हजार दंडासह घेतले हमीपत्र

अहेरी : सिरोंचा तालुक्यातल्या असरअल्ली येथील तत्कालीन उपसरपंच धर्मय्या किष्टया वडलाकोंडा यांना गावातील एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण करणे आणि अश्लील मॅसेज पाठवणे चांगलेच महागात पडले. अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने वडलाकोंडा यांना 5 हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्ष असे कृत्य करणार नाही याचे हमीपत्र देण्याची शिक्षा सुनावली.

न्यायालयीन सुत्रानुसार, उपसरपंच धर्मय्या वडलाकोंडा हे गावातील त्यांच्या ओळखीच्या एका महिलेसोबत असभ्य वागत होते. यातच त्यांनी त्या महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण सुरू केले. महिलेने टाळाटाळ केल्यानंतर उपसरपंचाची हिंमत आणखी वाढली. त्याने तिला अश्लील मॅसेजही केला. या प्रकाराने त्रस्त झाल्यानंतर त्या महिलेने याबद्दल पतीला सांगितले. पतीने उपसरपंचाच्या घरी जाऊन जाब विचारला. पण केलेल्या कृत्याची लाज न वाटता उपसरपंचाने शिवीगाळ करत तुला काय करायचे ते करून घे, असे धमकावले. यानंतर उपसरपंचाच्या पत्नीने त्या महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला धमकी दिली. यामुळे त्या महिलेने अखेर पोलिस स्टेशन गाठून झालेल्या प्रकाराची तक्रार दिली.

असरअल्ली पोलिसांनी तत्कालीन उपसरपंच धर्मय्या वडलाकोंडा (43 वर्ष) याच्यावर विनयभंगासह अॅट्रॅासिटीचे कलम लावून गुन्हा दाखल केला. अति.सत्र न्यायाधीश आर.एन.बावणकर यांनी साक्षीपुरावे तपासून आरोपी उपसरपंचाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, तसेच पुढील तीन वर्षाकरिता या प्रकारचे गुन्हे करणार नाही याचे हमीपत्र देण्यास सांगून 5 हजार रुपये दंड ठोठावला.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड.सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिवारी पवार आणि गजानन राठोड यांनी केला.