शोभाताईंच्या शिष्टाईने मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांची ४२ दिवसानंतर आंदोलनातून माघार

शेतकऱ्यांना मिळणार मोबदला, भूसंपादनही करणार

सिरोंचा : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील सिरोंचाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडीगड्डा बॅरेजच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे तब्बल 42 दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या शिष्टाईने 7 जून रोजी मागे घेण्यात आले. शोभाताई आणि तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करीत असलेल्या शेतकऱ्यांना लिंबूपाणी पाजून या आंदोलनाची सांगता केली. या प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या जमिनीचा मोबदला लवकरच मिळणार असून शेतकऱ्यांच्या उर्वरित मागण्याही शासनदरबारी मांडून पूर्ण केल्या जातील, असे शोभाताई फडणवीस यांनी सांगितले.

मेडीगड्डा करारानुसार या प्रकल्पाचे २० टक्के पाणी महाराष्ट्रातील नागरिकांच्या हक्काचे आहे. झिंगानूरसारख्या अनेक गावांत सध्या पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. 128 हेक्टरचे भूसंपादन तीन वर्षापासून स्थगित आहे. त्याचाच मोबदला महाराष्ट्र सरकार मिळवून देण्यास एवढा कालावधी लावत आहे, तर 128 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन प्रकल्पाच्या बॅकवाॅटरमध्ये बुडत असल्याबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला होता. त्या शेतजमिनीचे भूसंपादन कधी होणार, अशा विविध मागण्या घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे सिरोंचा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू होते. शेतकऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यासोबत पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे भूसंपादनही केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी राम रंगुवार, लक्ष्मण गणपुरपू, व्यंकटेश तोकला, प्रभाकररेड्डी मुस्कुला यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

सुरूवातीला शोभाताई फडणवीस यांनी अधिकाऱ्यांसोबत जाऊन मेडीगट्टा धरणाची पाहणी केली. त्यानंतर जवळपास दोन तास अधिकाऱ्यांसोबत या धरणासंदर्भात व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या आंदोलन मंडपात आल्या.