गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भाच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सुरजागड इस्पात प्रा.लि. या स्टील प्लान्टचा पायाभरणी समारंभ बुधवारी (दि.17) अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सावंत आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी 10 हजार कोटी रुपयांमधून होणार असून या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या 7 हजाराहून अधिक स्थानिकांना लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यातील वडलापेठ गावाच्या परिसरात एकात्मिक स्टील प्लान्टची उभारणी करणार असल्याचे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी सांगितले. या स्टील प्लान्टची उभारणी एकूण 350 एकर क्षेत्रात होणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि नक्षलग्रस्त भागात भरीव रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही ही महत्त्वाची गुंतवणूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
2030 पर्यंत उभारणी पूर्ण होणार
आम्ही 1.6 एमटीपीए बेनिफिशेशन प्लांट, 1.2 एमटीपीए पेलेट प्लांट आणि 4 x 650 टीपीडीचा स्पंज आयर्न प्लाट स्थापन करणार आहोत. इंडक्शन फर्नेस (0.75 MTPA), रोलिंग मिल (0.75 MTPA), आणि 120 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लाट 2026 मध्ये सुरू होणार आहे, संपूर्ण प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढे या एकात्मिक स्टील प्लांटची क्षमता वार्षिक 2 दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे हे आमचे भविष्यातील उद्दीष्ट असल्याचे सुनील जोशी यांनी सांगितले.
दोन वर्षांपासून सुरू होती तयारी
सुरजागड इस्पातची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू होती. भूसंपादनासाठी 8 ते 10 महिने लागले. या प्रकल्पाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सरकारसोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला होता. हा उपक्रम केवळ आर्थिक फायद्यासाठी नसून गडचिरोलीच्या विकासात एक नवीन अध्याय जोडणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.