गडचिरोली : सुरजागड इस्पात प्रा.लि.या लोहप्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाजप नेते तथा माजी खासदार अशोक नेते यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी हेलिपॅडवरच स्वागत केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांसंबंधीचे निवेदन ना.फडणवीस यांना सादर करत त्यांनी चर्चा केली. ओबीसी समाजाच्या मुलामुलींच्या वसतिगृहाच्या मुद्द्याकडेही त्यांनी निवेदनातून लक्ष वेधले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नेतेमंडळींचे स्वागत केल्यानंतर भाजप नेते व पदाधिकारी माघारी परतले. पण प्रकल्पाच्या भूमीपूजन सोहळ्याला त्यापैकी कोणीही आले नाही. या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशिवाय कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना कंपनीकडून निमंत्रण नसल्याचे समजते.