गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा ते कुंभी दरम्यान शेतात कामावर गेलेल्या 5 व्यक्ती नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतात अडकून पडल्या. यासंदर्भातील माहिती तहसील कार्यालयामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला कळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आले. या पथकाने तातडीने मोटारबोटच्या सहाय्याने तिथे पोहोचून अडकलेल्या सर्व व्यक्तींना सायंकाळी 5 वाजता सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले.
शेतात अडकलेल्या व्यक्तींमध्ये प्रमोद श्रावण बोबाटे (38 वर्ष) रा.गुरवळा, शेखर उईके (48 वर्ष) रा.गडचिरोली, सतीश चुधरी (38 वर्ष) रा.विहीरगाव, संजय बोरकुटे (45 वर्ष) रा.विहीरगाव, कुणाल बर्डे (21 वर्ष), रा.लेखामेंढा यांचा समावेश आहे.
ही बचाव मोहीम कार्य जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या टीम क्रमांक 2 चे पोलीस निरीक्षक डी.जे.दाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक एस.डी.कराळे व त्यांच्या पथकाच्या नेतृत्वामध्ये, जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांच्या उपस्थितीमध्ये राबविण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अक्षय भानारकर, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार, कल्पक चौधरी, अजित नरोटे तसेच गुरवळा गावातील नागरिक उपस्थित होते.