गडचिरोली : गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी वनमंत्री आणि वनखात्याच्या प्रधान सचिवांकडेही तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान संबंधित आरएफओने वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खरवडे यांनी केली आहे.
रोपवन लागवड, खोदतळे, साहित्य खरेदी, टिसीएमची कामे, कामावरील मजुर, मजुरांचे व्हाऊचर, त्यांचे बँक खाते पुस्तिका तपासून घेऊन अन्य कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी खरवडे यांनी केली होती. यादरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची विचारणा न करता चातगावचे वनपाल परशुराम मोहुर्ले यांनी चातगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी.पडवे यांच्या सांगण्यावरून 10 हजार रुपये आपल्या मुलाच्या अकाऊंटला पाठविले, असे खरवडे यांनी सांगितले. एवढेच नाही तर पैसे मिळाले का, अशी विचारणाही त्यांनी फोनवरून केली.
अशा पद्धतीने लाच देण्याचा प्रयत्न हा गुन्हा असल्याने त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी खरवडे यांनी केली. तसेच चातगाव वनपरिक्षेत्रात 2021 ते 2024 पर्यंतच्या कामांची व त्यावरील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी विजय खरवडे यांनी केली आहे.