गडचिरोली : छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावालगत गडचिरोली पोलिसांचे सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा पोलिसांच्या गोळ्यांनी वेध घेतला. या चकमकीदरम्यान एका पोलिस उपनिरीक्षकासह एक सी-60 कमांडो जखमी झाला. त्यांना हेलिकॅाप्टरने नागपूरला हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षातील ही सर्वात मोठी चकमक आहे.
छत्तीसगड कांकेर जिल्ह्याच्या सीमेवरील वांडोली गावाजवळ 12 ते 15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यात अपर पोलिस अधीक्षकांच्या (अभियान) नेतृत्वाखाली सात C-60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले. अधूनमधून पाऊस सुरू असताना आणि जंगलातून वाहत येणाऱ्या नाल्यांना भरपूर पाणी असताना त्याची तमा न बाळगता सी-60 च्या पथकांनी हे आॅपरेशन सुरू केले.
वांडोली परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला. संध्याकाळी उशिरापर्यंत, म्हणजे 6 तासांपेक्षा जास्त काळ अधूनमधून हा गोळीबार सुरू होता. संध्याकाळी अंधार पडत असताना परिसरात केलेल्या शोध अभियानात आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय आतापर्यंत तीन AK-47, दोन इन्सास, 1 कार्बाइन, 1 एसएलआर अशा अत्याधुनिक सात रायफल्स पोलिसांच्या हाती लागल्या. मृत नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी कमांडर लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम असल्याचे पोलिसांनी कळविले. इतर जणांची ओळख पटविण्याचे आणि परिसरात आणखी काही सापडते का याचा शोध सुरू आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशस्वी अभियानासाठी C-60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.